संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंबेड बुद्रुक येथे दुचाकीवरील चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, मागे बसलेला तरुण उजव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलसमोर, आंबेड बुद्रुक येथे घडली.
अनिकेत प्रमोद मनवे (२३) आणि कल्पेश नामदेव मनवे (२३), दोघेही रा. उजगाव शेवरवाडी, ता. संगमेश्वर अशी जखमी तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत मनवे हा ड्रीम युगा मोटरसायकल (एमएच ०८ एबी ४०६४) घेऊन मागे कल्पेश याला बसवून रत्नागिरीहून उजगावच्या दिशेने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जात होता. आंबेड बुद्रुक येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलसमोर आल्यानंतर चालकाच्या डोळ्यावर अचानक झापड आल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली.
अपघातात अनिकेत मनवे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर कल्पेश मनवे याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्रचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून, या अपघाताचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.









