खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात चिंचघर दस्तुरी येथे पैशांच्या वादातून एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. रश्मी विजय भोजानी आणि त्यांचे पती विजय अमृतलाल भोजानी हे २२ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी असताना आरोपी तिथे आले. पैशांच्या वादातून कमल विकास पवार, अर्जुन विकास पवार, अक्षय विकास पवार आणि शुभम नलावडे (सर्व रा. दस्तुरी, चिंचघर) यांनी जबरदस्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला.
यावेळी आरोपी कमल पवार आणि शुभम नलावडे यांनी रश्मी भोजानी यांना हाताने मारहाण करत फावड्याच्या लाकडी दांडक्याने मानेवर वार केले. तसेच त्यांच्या डोक्यावर दगड फेकून मारून दुखापत केली. या झटापटीत रश्मी यांचे मंगळसूत्रही तोडण्यात आले. दरम्यान, त्यांना सोडवण्यासाठी आलेले त्यांचे पती विजय भोजानी यांनाही अर्जुन पवार आणि अक्षय पवार यांनी लाकडी दांडका आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. आरोपींनी या दाम्पत्याला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी रश्मी भोजानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी आरोपी कमल पवार, अर्जुन पवार, अक्षय पवार आणि शुभम नलावडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये (कलम ३३२(सी), ३२४(२), ११८(१), ३५१(३), ३५२, ३(५)) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









