Sunday, July 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी टिळक आळीतील वृद्धाची १.६८ लाखांची फसवणूक

रत्नागिरी टिळक आळीतील वृद्धाची १.६८ लाखांची फसवणूक

पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने ऑनलाइन गंडा

रत्नागिरी:- पेन्शन कार्ड अद्ययावत करण्याच्या बहाण्याने अनोळखी सायबर भामट्याने ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख ६८ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना रत्नागिरी शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ श्रीनिवास गोरे (वय ४३, रा. टिळक आळी, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ९ जुलै रोजी दुपारी त्यांच्या वडिलांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून पेन्शन कार्डबाबत माहिती देत व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली. संबंधित लिंकवर प्रक्रिया करण्यास सांगून आरोपीने त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस स्वतःकडे घेतला.

यानंतर आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या गाडीतळ शाखेतील ज्येष्ठ नागरिकांच्या बचत व पेन्शन खात्यातून एकूण १ लाख ६८ हजार ५०० रुपये परस्पर काढून आर्थिक फसवणूक केली. फिर्यादींचे वडील ८३ वर्षांचे असल्याने या घटनेची ऑनलाइन तक्रार प्रथम सायबर पोर्टलवर नोंदविण्यात आली होती. त्यानंतर संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने कौस्तुभ गोरे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या सायबर फसवणुकीचा अधिक तपास करीत आहेत.