रत्नागिरी:- धरण उशाशी आणि कोरड घशाशी या म्हणीचा प्रत्यय सध्या रत्नागिरीकरांना येत आहेत. पालिकेच्या माध्यमातून १६ कोटी रुपये खर्च करून पानवल धरणाची दुरूस्ती आणि गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. यंदा पावसाळ्यात धरणात मुबलक पाणीसाठाही उपलब्ध होईल; मात्र नैसर्गिक उताराने शहराला मिळणाऱ्या या हक्काच्या पाण्यापासून शहरवासीय वंचित राहण्याचीच शक्यता आहे. पानवल धरणापासून ते नाचणे येथील मुख्य जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आवश्यक पाईपलाईनचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे गंभीर पेच निर्माण झाला आहे. जुनी थकबाकी न मिळाल्याने ठेकेदाराने काम थांबवले आहे. त्यामुळे धरणासाठी कोट्यवधी खर्च करूनही पाणीप्रश्न ‘जैसे थे’ राहणार आहे.
रत्नागिरी शहराचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी पालिकेने १६ कोटी रुपयांचा मोठा निधी खर्च करून पानवल धरणाचे नूतनीकरण केले. यामध्ये धरणाची गळती थांबवण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे, सांडव्याचे आधुनिकीकरण करणे आणि साचलेला हजारो टन गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. या कामामुळे धरणाची गळती थांबली आहे. साठवण क्षमताही वाढली आहे. पावसाळ्यानंतर या धरणातून फेब्रुवारी महिन्यापर्यंत शहराला पाणीपुरवठा होतो. धरणाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु धरणातील पाणी नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी मुख्य वाहिनी टाकण्याचे कामच झालेले नाही. त्यामुळे धरणात पाणी साठूनही ते शहरापर्यंत आणणे अशक्य आहे.
पावसाळा तोंडावर आलेला असताना एक किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर 16 कोटींचा प्रकल्प कागदावरच राहणार आहे. धरण तुडुंब भरूनही तांत्रिक कारणास्तव नागरिकांना इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे पालिकेने तत्काळ हस्तक्षेप करून ठेकेदाराची थकबाकी द्यावी आणि हे काम तातडीने पूर्ण करून घेणे आवश्यक आहे अन्यथा शहराला फक्त शीळच्या धरणावरच अवलंबून राहावे लागेल.









