Thursday, May 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी चार कंपन्यांकडून बारसू, पूर्णगडसह देवगडला 6.5 लाख कोटींची गुंतवणूक

चार कंपन्यांकडून बारसू, पूर्णगडसह देवगडला 6.5 लाख कोटींची गुंतवणूक

रत्नागिरी:- महाराष्ट्र सरकारने कोकणातील ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अणुऊर्जा क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या सहभागाला परवानगी देण्यासाठी आणलेल्या नव्या धोरणानंतर राज्य सरकारने अदानी, रिलायन्स, बजाज आणि एनटीपीसीएल यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत महत्त्वाचे करार केले आहेत. या करारांमुळे राज्यात एकूण 25,400 मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे प्रकल्प प्रामुख्याने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू आणि पूर्णगड तसेच सिंधुदुर्गातील देवगड परिसरात उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे सुमारे 6.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.या नव्या उपक्रमात अदानी पॉवर लिमिटेड बारसू येथे 6000 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारणार आहे, ज्यासाठी अंदाजे 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पातून सुमारे 12 हजार लोकांना रोजगार मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीज पूर्णगड येथे 7200 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारणार असून यासाठी सुमारे 2 लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पातून सुमारे 1 लाख रोजगार निर्माण होतील असा दावा करण्यात आला आहे.देवगड येथे एनटीपीसीएलकडून 7200 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पातून सुमारे 5 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत.याशिवाय ललितपूर पॉवर जनरेशन कंपनीकडूनही 5000 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि सुमारे 3 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व करारांची माहिती त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमधून दिली आहे. केंद्र सरकारने अणुऊर्जा क्षेत्रात खासगी सहभागाला मान्यता देण्यासाठी लागू केलेल्या नव्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत. या कायद्यामुळे 2047 पर्यंत देशात 100 गिगावॉट अणुऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.