Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दोन गटांतील भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला मारहाण

दोन गटांतील भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला मारहाण

किया शोरूमसमोर प्रकार; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर संशयिताने स्टीलच्या रॉडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ५ च्या दरम्यान ‘किया’ शोरूमसमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहेल शौकत याहू (वय २८, रा. जेल रोड) यांचा कामगार विनोद मुदकवी आणि आरोपी ऋतिक वेदरे यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादी सुहेल हे घटनास्थळी गेले होते. समझोता झाल्यानंतर फिर्यादी तेथून निघत असताना, आरोपींनी कामगार विनोद याचा पाठलाग करून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

कामगाराला वाचवण्यासाठी सुहेल आणि त्यांचे मित्र करीम तांबोळी प्रयत्न करत असतानाच, सुहेल यांचा भाऊ शौद शौकत याहू तेथे आला. त्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी मुज्जमील पडवेकर याने रागाच्या भरात स्टीलच्या रॉडने शौद याच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात शौद गंभीर जखमी झाला आहे.

मारहाणीनंतर आरोपींनी फिर्यादी सुहेल आणि करीम तांबोळी यांना शिविगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच “पुन्हा आडवे आलात तर ठार मारू,” अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली.

मुज्जमील अजीज पडवेकर (रा. धनजीनाका, बैलबाग, रत्नागिरी), ऋतिक चंद्रकांत वेदरे (रा. करबुडे, वेदरेवाडी, रत्नागिरी) या दोघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) (धोकादायक शस्त्राने दुखापत), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.