Wednesday, June 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी देऊड येथे १९ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

देऊड येथे १९ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावातील एका अत्यंत दुर्दैवी घटनेत, हॅलोजन बल्ब बदलताना विजेचा तीव्र धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जयराज संजय देसाई असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या या अकाली निधनामुळे संपूर्ण जाकादेवी परिसरात शोककळा पसरली आहे.

ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. जयराज आपल्या घरासमोरील गाडीच्या शेडजवळ काम करत होता. शेडमधील एक हॅलोजन बल्ब खराब झाला असल्याने, तो बदलण्यासाठी त्याने प्रयत्न केला. मात्र, विद्युत प्रवाह (लाईट) चालू असल्याचे त्याला समजले नाही. चालू असलेल्या विद्युत वाहिनीला हात लागताच त्याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. हा प्रकार पाहून उपस्थित कुटुंबियांनी आणि मित्रांनी एकच हंबरडा फोडला. त्याला तातडीने जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.