Saturday, August 29, 2026
spot_img
Home रत्नागिरी गणेशोत्सवापूर्वी रस्ते, वीज, एसटी वाहतूक सुरळीत करण्याचे जि.प. प्रशासनाला निर्देश

गणेशोत्सवापूर्वी रस्ते, वीज, एसटी वाहतूक सुरळीत करण्याचे जि.प. प्रशासनाला निर्देश

बांधकाम समितीची बैठकीत आक्रमक भूमिका

रत्नागिरी:- जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत रस्ते दुरुस्ती, वीज पुरवठा आणि एसटी बसफेऱ्यांच्या अनास्थेवरून बांधकाम समिती सदस्य श्री. महेंद्र झापडेकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत त्यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या  आहेत.

सभेत चर्चेदरम्यान रस्त्यांच्या दयनीय स्थितीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. काजघटी  ते देवधे रस्त्यावरील पडलेले खड्डे,  चांदेराई , कुरतडे रस्ता, चिद्रवली  बौद्धवाडी ते लोखंडवाडी रस्ता यांसारखे मार्ग अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना आणि ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर आक्रमक भूमिका घेत श्री. झापडेकर यांनी हे सर्व रस्ते गणेशोत्सवापूर्वी पूर्णपणे सुस्थितीत आणण्याची सूचना केली.यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत दोन दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. सोमेश्वर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम देखील बांधकाम समितीच्या मीटिंगमधील आक्रमक पाठपुराव्यामुळे सुरू करण्यात आले असून, या सर्व प्रकरणाची पालकमंत्री उदय सामंत यांनीही गांभीर्याने दखल घेत बांधकाम विभागाला योग्य ते आदेश दिले आहेत.

रस्त्यांच्या दुरवस्थेसोबतच महावितरणच्या कारभारावरही तीव्र शब्दांत ताशेरे ओढण्यात आले. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे त्रस्त झालेल्या सदस्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वारंवार जाणारी वीज आणि त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. यावर महावितरणनेही सकारात्मक पाऊल उचलत लाईनवरील अडथळा ठरणारी झाडेझुडपे तोडून टाकण्यात येतील आणि भविष्यात वारंवार वीज जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या संदर्भात हरचिरी आणि माडवकवाडी भागात एसटी बसफेऱ्या अनियमित असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या भागांमध्ये एसटी बस  नियमितपणे आणि वेळेत सोडावी, जेणेकरून शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी करण्यात आली असून एसटी अधिकाऱ्यांनीही यावर योग्य ती अंमलबजावणी करण्याचे मान्य केले आहे. लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासकीय यंत्रणेला आता कामाला वेग द्यावा लागला असून नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटतील अशी अपेक्षा आहे.