Wednesday, June 10, 2026
spot_img
Home दापोली झाडाखाली झोपलेल्या चिमुकलीला अज्ञात वाहनाने चिरडले

झाडाखाली झोपलेल्या चिमुकलीला अज्ञात वाहनाने चिरडले

दापोली-हर्णे बायपास येथील घटना

दापोली:- दापोली हर्णे बायपास परिसरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका मजुराच्या ४ वर्षांच्या चिमुकलीवर काळाने घाला घातला. रस्त्याचं काम सुरू असताना बाजूलाच झाडाच्या सावलीत झोपलेल्या सानवी गणपत राठोड या चिमुकलीला एका अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात ती गंभीररित्या जखमी झाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राठोड कुटुंब कामानिमित्त दापोलीत आले होते. दापोली-हर्णे बायपास परिसरात सध्या रस्त्याचं काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे सानवीचे आई-वडील रस्त्याच्या कामात व्यस्त होते. दुपारच्या कडक उन्हापासून वाचवण्यासाठी त्यांनी आपली ४ वर्षांची लाडकी लेक सानवी हिला जवळच असलेल्या एका झाडाच्या सावलीत झोपवलं होतं. ती गाढ झोपेत असतानाच तिथे एक घात झाला. या दुर्दैवी घटनेनंतर राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सानवी झाडाखाली झोपलेली असतानाच, तिथून जाणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाचे चाक तिच्या अंगावरून गेले. हा प्रकार इतक्या अचानक घडला की कोणाला काही समजायच्या आत ते वाहन तिथून पसार झाले. झाडाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सानवीला पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांच्या मदतीने सानवीला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.

मजुरांच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दिवसभर उन्हातानात राबणाऱ्या बांधकाम मजुरांच्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. आई-वडील कामात व्यस्त असताना ही निष्पाप चिमुकली थेट मृत्यूच्या विळख्यात सापडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही आणि तिथल्या स्थानिकांची चौकशी करून अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.