दापोली:- रस्त्याचे काम सुरू असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या एका भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टरवर बसलेले अन्य दोन मजूरही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दापोली तालुक्यातील भोईवाडी ते फरारे जंगलजेटी दरम्यानच्या रस्त्यावर ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार,सुनील बंधन बडाईक (वय २८ वर्षे, मूळ रा. झारखंड, सध्या रा. दस्तुरी, खेड) हा ट्रॅक्टर (क्र. एमएच-17-व्ही-496) घेऊन भोईवाडीकडून फरारे जंगलजेटीच्या दिशेने जात होता. सुनीलकडे ट्रॅक्टर चालवण्याचा कोणताही अधिकृत परवाना किंवा तांत्रिक ज्ञान नव्हते. उतार असलेल्या रस्त्यावर अचानक त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर उलटला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुनीलचा जागीच मृत्यू झाला.
अपघातावेळी चालकाच्या बाजूला बसलेले दोन कामगारही ट्रॅक्टरखाली चिरडले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत.त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.सोनाली (शानाबाई) तुकाराम चव्हाण (वय ४० वर्षे) यांच्या डोक्याला,पायाला,कमरेला आणि मांडीला गंभीर इजा झाली आहे.संतोष दत्तू चौगले वय ४१ वर्षे हे देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी अभिजित रामचंद्र पवार यांनी फिर्याद दिली आहे. प्राथमिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून असे समोर आले आहे की मृत चालकाने निष्काळजी पणे आणि विनापरवाना वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूला व इतरांच्या दुखापतीला कारणीभूत ठरला आहे.या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









