Saturday, November 7, 2026
spot_img
Home दापोली बसच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

बसच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

दापोली:- दापोली येथील एस. टी. बस स्थानक परिसरात गुरुवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. एस. टी. बस चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात गाडी चालवून एका ६९ वर्षीय वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेच्या दोन्ही पायांवरून बसचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी सुमारे ५.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी फातीमा हमीद जोगीलकर (वय ६९, रा. दिवाण खवटी मोहल्ला, ता. खेड, जि. रत्नागिरी) या दापोली एस. टी. आगारातून बाहेर चालत जात होत्या. त्याच वेळी समोरून आलेली ‘कोळबांद्रे बेजेवाडी ते दापोली’ या मार्गावरील एस. टी. बस (क्रमांक MH 20 BL 2127) आगारात प्रवेश करत होती.
बस चालक गोरख सुदाम चिंचकर (वय ४०, रा. जालगाव, ता. दापोली, मूळ रा. कळसम, जि. बीड) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बस भरधाव, बेदरकार आणि धोकादायक रीतीने चालवून वळण घेतले. यावेळी डाव्या बाजूने जात असलेल्या फातीमा जोगीलकर यांना बसने जोरदार धडक दिली. या अपघातात बसचे पुढील डावे चाक फातीमा यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी फिर्यादी फातीमा जोगीलकर यांच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री ९.२१ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे (गु.र.नं. २४१/२०२६). पोलिसांनी आरोपी एस. टी. चालक गोरख चिंचकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटर वाहन कायदा कलम १८४ (भा.द.वि. कलम २७९, ३३७, ३३८) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.