Thursday, July 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जांभारी येथील गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी तरुण अटकेत

जांभारी येथील गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी तरुण अटकेत

संगमेश्वरच्या संशयितास दोन दिवसांची कोठडी

रत्नागिरी:- जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभारी गावात घडलेल्या गावठी हातबॉम्ब स्फोटाच्या धक्कादायक घटनेत पोलिसांनी कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक केली आहे. अविनाश गोपीनाथ खेडेकर (रा. मुरादपूर, ता. संगमेश्वर) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत एका महिलेच्या हाताची बोटे निकामी झाली होती.

जांभारी गावात गावठी हातबॉम्ब फुटल्याची गंभीर घटना घडली होती. या स्फोटात संबंधित महिलेला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २८/२०२६ गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला होता.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अविनाश खेडेकर याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाशी संबंधित इतर संशयितांचा शोध सध्या पोलीस घेत असून, प्रभारी पोलीस निरीक्षक संजय पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.