Thursday, July 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लांजा-हर्चे पोस्ट ऑफिसमध्ये ८.२० लाखांचा अपहार

लांजा-हर्चे पोस्ट ऑफिसमध्ये ८.२० लाखांचा अपहार

तत्कालीन शाखा डाकपालावर गुन्हा दाखल

लांजा:- हर्चे येथील शाखा डाकघरात कार्यरत असताना ग्राहकांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखा डाकपाल जयप्रकाश यशवंत पवार (रा. हर्चे, ता. लांजा) याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर सूर्यकांत बेल्हेकर, डाकघर निरीक्षक, लांजा उपविभाग यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जयप्रकाश पवार हा हर्चे शाखा डाकघरात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असताना, त्याने पोस्टाचे खाते उघडण्यासाठी ग्राहकांकडून स्वीकारलेली रक्कम सरकारी दस्तऐवजात नोंदवली नाही. २९ जुलै २०१३ ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत त्याने ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ८,२०,१५२ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये ५,३०,१५२ रुपये ही कायमस्वरूपी रक्कम, तर २,९०,००० रुपये ही तात्पुरती रक्कम असा एकूण ८,२०,१५२ रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे. या प्रकरणी १३ जुलै २०२६ रोजी रात्री २१.१९ वाजता लांजा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४०९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.