Tuesday, October 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कौटुंबिक वादातून भावावर लाकडी दांडक्याने हल्ला

कौटुंबिक वादातून भावावर लाकडी दांडक्याने हल्ला

चिपळूण कादवड येथे डोके फोडून जीवे मारण्याची धमकी

चिपळूण:- तालुक्यातील कादवड धनगरवाडी येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्याच सख्ख्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडका मारून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. बहिणीला घरात येण्यावरून जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कादवड धनगरवाडी येथील रहिवासी संतोष बाबा वरक (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा धाकटा भाऊ आरोपी रमेश बाबा वरक (वय ३०) हा खेड येथून कुलदैवताच्या दर्शनासाठी आपल्या दोन मुलांसह कादवड येथील घरी आला होता. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची बहीण विमल सचिन झोरे (रा. खोपी-शिरगाव, ता. खेड) ही देखील पाठोपाठ माहेरी आली. बहिणीला पाहताच रमेश वरक याने संतापून “तू इथे का आलीस, तू इथे यायचे नाही, हे घर माझ्या बापाचे आहे,” असे म्हणत तिला हटकले. त्यावर मोठे बंधू संतोष वरक यांनी मध्यस्थी करत “जसे हे तुझ्या बापाचे घर आहे, तसेच तिच्याही बापाचे आहे, ती येणारच,” असा जाब रमेशला विचारला.

या बोलण्याचा प्रचंड राग मनात धरून रमेश वरक याने घरातील लाकडी दांडका उचलून थेट संतोष वरक यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यामुळे संतोष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर आरोपी रमेश वरक याने “तुम्ही माझ्या शेतीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुम्हाला बघून घेईन,” अशी जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पोबारा केला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतोष वरक यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. या घटनेनंतर संतोष वरक यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रमेश वरक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२) (तसेच भादंवि कलम ३२४, ५०६) अन्वये गुन्हा नोंदवला असून शिरगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.