गणपतीपुळे-मालगुंड येथे इमारतीवरून पडून जखमी कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- गणपतीपुळे-मालगुंड येथे एका इमारतीच्या बांधकामावर काम करत असताना छतावरून पडून गंभीर जखमी झालेल्या ५० वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नंदकुमार अंजुनाथ देसाई (रा. बेळगाव, कर्नाटक) असे या मयत कामगाराचे नाव आहे. ही दुर्घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती, ज्याची नोंद रविवारी रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार देसाई हे मूळचे खानापूर (जि. बेळगाव) येथील रहिवासी होते. ते गणपतीपुळे-मालगुंड परिसरात भाई गांगण यांच्या मालकीच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर गवंडी काम करत होते. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काम करत असताना अचानक पाय घसरून ते इमारतीच्या छतावरून खाली पडले.
या अपघातात त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे हलवण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना पुढील उपचारासाठी कर्नाटक येथील हुबळी येथील के.आय.एम.एस. रुग्णालयात दाखल केले.

हुबळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेबाबत रविवारी रत्नागिरी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ क्र. १४/२०२६) केली आहे.