चिपळूण पोलिसांची धडक कारवाई
चिपळूण:- शहरातील खेर्डी एमआयडीसी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चिपळूण पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून घातक ‘एमडी’ (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ आणि एक चारचाकी जप्त केली आहे. रोहिदास बाळू पवार (वय २८, रा. पिंपळी खुर्द, ता. चिपळूण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.२६ वाजण्याच्या सुमारास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप सदाशिव माणके व त्यांचे पथक खेर्डी एमआयडीसी भागात गस्त घालत होते. त्या दरम्यान पी. डी. इन्फ्रा कंपनीसमोरील रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या सुझुकी अर्टिगा कारची (क्रमांक एमएच ४६ झेड ७६८२) तपासणी केली असता, त्यामध्ये बसलेला रोहिदास पवार हा संशयास्पदरीत्या हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याची अंगझडती व गाडीची तपासणी केली असता, त्याच्या ताब्यात एका प्लास्टिकच्या पाऊचमध्ये सफेद खडे व पावडर स्वरूपातील सुमारे ३ ग्रॅम वजनाचा ‘एमडी’ हा अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या बाळगलेला आढळून आला.
पोलिसांनी सुमारे १२ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ आणि गुन्ह्यात वापरलेली सुमारे सात लाख रुपये किमतीची अर्टिगा चारचाकी असा एकूण ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवरच जप्त केला. या तपास प्रक्रियेत पोलिसांनी ‘ई-साक्ष’ ॲपचा वापर करून डिजिटल पुरावे नोंदवून घेतले. यानंतर पहाटे साडेपाच वाजता रोहिदास पवार याला अधिकृतरीत्या अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस कलम ८(क), २१(ब)) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला संशयित रोहिदास पवार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी दरोडा, प्राणघातक हल्ला, चोरी, अपहरण तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत चिपळूण पोलीस ठाण्यात तब्बल आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून, हा साठा त्याने कोठून आणला आणि कोणाला विकणार होता, या दिशेने चिपळूण पोलीस सखोल तपास करत आहेत.









