Friday, May 8, 2026
spot_img
Home गुन्हेगारी केबल चोरीप्रकरणी एकाला रंगेहात अटक

केबल चोरीप्रकरणी एकाला रंगेहात अटक

खांडोत्री येथील घटनेत ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोघांचा शोध सुरू

चिपळूण:- तालुक्यातील पिलवली फाटा, खांडोत्री येथील एका चिरेखाणीतून ४५ हजार रुपये किमतीची तांब्याची केबल चोरल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. कल्पेश दिलीप शिर्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचे अन्य दोन साथीदार रिक्षासह पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

​फिर्यादी राजेश चंद्रकांत सर्वे (वय ४३, रा. निवळी कातळवाडी) यांची खांडोत्री येथे चिरेखाण आहे. दि. १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २ ते २:३० च्या सुमारास त्यांच्या खाणीवरील पॉलिकॅब कंपनीची सुमारे ३५० मीटर लांबीची तांब्याची केबल चोरीला गेली होती. या केबलची किंमत सुमारे ४५,००० रुपये आहे.

​दि. ६ मे रोजी पहाटे १:३० वाजताच्या सुमारास, शेजारील चिरेखाणीचे मालक दिनेश काशीराम घडशी यांनी फिर्यादींना फोन करून माहिती दिली की, त्यांच्या खाणीत एक संशयित इसम शिरला होता. खाणीचा मुकादम महेश भीमराव शिंदे याने त्या संशयिताला हटकले असता तो पळून जाऊ लागला, मात्र सतर्कतेने त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. यावेळी त्याचे इतर दोन साथीदार एका अप्पे रिक्षामधून अंधाराचा फायदा घेत पळून गेले. ​पकडलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने आणि त्याच्या साथीदारांनीच राजेश सर्वे यांच्या चिरेखाणीतील केबल चोरल्याचे निष्पन्न झाले.

पॉलिकॅब कंपनीची ६ एम.एम. ३ कोअर तांब्याची केबलचे१०० मीटरचे तीन तुकडे आणि ५० मीटरचा एक तुकडा असा एकूण ४५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला.

​याप्रकरणी आरोपी कल्पेश दिलीप शिर्के (वय २९, रा. उगवतवाडी, कालस्ते बुद्रुक, ता. चिपळूण) आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या दोन आरोपींचा आणि रिक्षाचा शोध पोलीस घेत आहेत.