दोघांवर गुन्हा दाखल
संगमेश्वर:- तालुक्यातील आंबवली (मुसलमानवाडी) येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकसहभागातून बसविण्यात आलेले सोलार स्ट्रीट लाईट चोरल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ जुलै रोजी रात्री ११ ते ११.३० या वेळेत घडली असून, या प्रकरणी २७ जुलै रोजी सकाळी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबवली मुसलमानवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर नागरिकांच्या सहभागातून सोलार पॅनलचे स्ट्रीट लाईट बसविण्यात आले होते. आरोपींनी आपसात संगनमत करून हे लाईट्स चोरून नेले.
या प्रकरणी उमेर गफार शिरगावकर (वय २६, रा. आंबवली मुसलमानवाडी, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून खालील दोन व्यक्तींवर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) नुसार गणेश सीताराम गुरव (वय २९, रा. उक्षी सावंत गुरववाडी, ता. व जि. रत्नागिरी), संतोष पांडुरंग देवळेकर (वय ४०, रा. चर्माकरवाडी, ता. व जि. रत्नागिरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत १८,००० रुपये असून त्यात प्रत्येकी ६,००० रुपये किमतीच्या तीन जुन्या वापरत्या सोलार स्ट्रीट लाईट्सचा समावेश आहे. या लाईट्सच्या पुढील बाजूस आयताकृती तीन एलईडी बल्ब आणि काळ्या रंगाचे सोलार पॅनल बसविलेले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









