Thursday, October 1, 2026
spot_img
Home रत्नागिरी अंगारकी दिवशी गणपतीपुळेत ५० ते ६० हजार भाविकांची हजेरी

अंगारकी दिवशी गणपतीपुळेत ५० ते ६० हजार भाविकांची हजेरी

गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या भक्तीभावात, शांततेत व उत्साहात पार पडला . या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवानिमित्ताने घाटमाथ्यावरील सुमारे ५० ते ६० हजार भाविकांनी स्वयंभू श्रींचे मनोभावे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली.

अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवानिमित्त स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले त्यामध्ये प्रारंभी गणपती मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा ,मंत्र पुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले. यावेळी भाविकांना श्रींचे दर्शन सुलभ आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिळावे यासाठी देवस्थान समितीकडून मंदिर परिसरात खास दर्शन रांगांची व्यवस्था अतिशय चोख करण्यात आली होती. तसेच दर्शन रांगांच्या ठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.त्याचबरोबर दर्शन रांगांमध्ये उभे राहिलेल्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांबरोबरच रत्नागिरी येथील श्री अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी विशेष कामगिरी बजावली . तसेच मंदिर व परिसरातील सर्वच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत सुमारे 15 पोलीस अधिकारी आणि 138 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला पोलीस बंदोबस्त चोख बजावला. त्यामध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता .तसेच भाविकांचे आरोग्याच्या दृष्टीने खास उपाययोजना करण्यासाठी मंदिर परिसरात मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने आपली कामगिरी अतिशय योग्य प्रकारे बजावली.या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता आग लागल्याची दुर्घटना उद्भवल्यास रत्नागिरी येथील नगर परिषदेच्या वतीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. तसेच आपत्कालीन सेवेसाठी देवस्थान समितीच्या वतीने रूग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. तसेच या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी एसटी महामंडळाकडून घाटमाथ्यावरील भाविकांसाठी विशेष जादा गाड्या सोडण्यात आल्या.त्यामुळे घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणच्या भाविकांनी दर्शनासाठी आपली उपस्थिती मोठ्या संख्येने लावल्याचे दिसून चित्र दिसून आले .तसेच समुद्रकिनाऱ्यावर कुठलीही दुर्घटना व अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस यंत्रणेबरोबरच होमगार्ड, जीवरक्षक व गणपतीपुळे देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी आपली गस्त घालून विशेष कामगिरी बजावली.या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर घाटमाथ्यावरील विविध दुकानदार दाखल झाले होते. त्यामुळे अंगारकीच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शनाबरोबरच यात्रेचा मनमुराद आनंद लुटता आला. तसेच घाटमाथ्यावरील कोल्हापूर, सांगली येथील काही गणेश मंडळाकडून भाविकांसाठी सकाळ सत्रात खिचडी तर सायंकाळच्या सत्रात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतल्याचे चित्र दिसून आले .” सायंकाळी स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक ” दरम्यान, अंगारकीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीकडून सायंकाळी साडेचार वाजता ढोल ताशांच्या गजरात, वाजत- गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणूकीत पुजारी, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ भाविक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी अतिशय शिस्तबद्ध व श्रद्धाभावनेने दर्शन घेतल्याचे चित्र दिसून आले. यावेळी मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष प्रत्येक दर्शन रांगांतून मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. हा अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती, ग्रामपंचायत गणपतीपुळे, पोलीस यंत्रणा व अन्य सर्वच विभागांनी विशेष मेहनत घेतली.