लांजा:- राजापूर येथून बाराव्याचा कार्यक्रम आटोपून रत्नागिरीकडे परतणाऱ्या टाटा अल्ट्रोज कारला राजस्थानहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारची लांजा येथील उड्डाणपुलावर समोरासमोर जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी घडलेल्या या अपघातात अल्ट्रोज कारमधील दोघे जण जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने स्कॉर्पिओ कारमधील तीन लहान मुलांसह पाचही प्रवासी या अपघातातून सुखरूप बचावले आहेत.

अपघाताबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नाचणे श्रीरामनगर, रत्नागिरी येथील गुरव कुटुंबीय आपल्या टाटा अल्ट्रोज कारने (क्रमांक एमएच ०८ बीई १०६७) राजापूर खांबवाडी येथे बाराव्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून ते रत्नागिरी येथे परतत असताना लांजा उड्डाणपुलावर हा अपघात घडला. ही कार प्रसाद रघुनाथ गुरव (वय ३२, रा. नाचणे श्रीरामनगर, रत्नागिरी) हे चालवत होते. त्यांच्यासोबत कारमध्ये रेखा रघुनाथ गुरव (वय ५५), शितल रघुनाथ गुरव (वय २७, दोघे रा. नाचणे श्रीरामनगर, रत्नागिरी) तसेच मिरजोळे येथील सुजाता हरेंद्र गुरव (वय ५५) आणि हरेंद्र महादेव गुरव (वय ५९) असे पाच जण प्रवास करत होते. या भीषण धडकेत अल्ट्रोज कारमधील दोघे प्रवासी जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त दुसरी स्कॉर्पिओ कार (क्रमांक जीजे ०२ डीपी ९९५९) राजस्थानहून कारवारच्या दिशेने जात होती. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील भिनमाल तालुक्यातील बडकरा येथील कृष्णकुमार हिराराम देवासी (वय २६) हे आपली पत्नी चंपादेवी कृष्णकुमार देवासी (वय २३), मुलगी लक्षीता (वय ५ वर्षे) आणि दोन मुले माहिर (वय २.५ वर्षे) व प्रिन्स (वय १.५ वर्षे) यांच्यासह १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राजस्थानहून प्रवासासाठी निघाले होते. वाटेत अहमदाबाद आणि मुंबई येथे रात्रीचा मुक्काम करून ते १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कारवारच्या दिशेने रवाना झाले होते. लांजा उड्डाणपुलावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला असून, याप्रकरणी लांजा पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.









