Monday, November 16, 2026
spot_img
Home लांजा लांज्यात रानडुकरांना वाचवताना दुचाकी घसरून एकाचा मृत्यू

लांज्यात रानडुकरांना वाचवताना दुचाकी घसरून एकाचा मृत्यू

लांजा:- रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या रानडुकरांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मागील सीटवर बसलेल्या ५५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रकांत नारायण गुरव (वय ५५, रा.गोविळ गुरववाडी, ता.लांजा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. देवधे मार्गावरील उपळे फाट्याजवळ १३ नोव्हेंबर रोजी रात्री हा अपघात घडला होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत गुरव हे त्यांचे भाचे अनिकेत गोपीनाथ गुरव (वय ३५, रा.गवाणे गुरववाडी, ता.लांजा) यांच्या दुचाकीवरून (एमएच.०८.बीजी.९६९०) मागील सीटवर बसून गवाणे येथून पावस सापुचेतळे मार्गे जात होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पावस देवधे मार्गावरील उपळे फाट्याजवळील जंगल परिसरात अचानक चार ते पाच रानडुकरे रस्त्यावर आडवी आली.

या रानडुकरांना वाचविण्यासाठी अनिकेत यांनी दुचाकीला ब्रेक लावला. मात्र, दुचाकी घसरून दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात चंद्रकांत गुरव गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.