Sunday, November 15, 2026
spot_img
Home लांजा अंजनारी येथील अपघातप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

अंजनारी येथील अपघातप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा तालुक्यातील अंजनारी पुलाजवळ भरधाव वेगाने १६ चाकी मालवाहू ट्रक चालवून प्रवासी वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याप्रकरणी राजस्थानच्या ट्रक चालकाविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात प्रवासी वाहनातील २७ प्रवाशांपैकी २२ प्रवासी तसेच स्वतः ट्रक चालक असे एकूण २३ जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी मूळचे गुहागर तालुक्यातील शिवणे (धायंबेवाडी) येथील आणि सध्या विरार (जि. पालघर) येथे राहणारे तक्रारदार ऋषिकेश अनंत जोशी (वय २३) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार जोशी हे आपल्या सहप्रवाशांसह मुंबई-गोवा महामार्गावरून मालवणच्या दिशेने प्रवास करत होते. पहाटे ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास त्यांचे वाहन लांजा तालुक्यातील अंजनारी पुलावर आले असता, पाठीमागून अत्यंत भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे येणाऱ्या १६ चाकी टाटा एलपीटी ट्रकने (क्र. आरजे १९ जीजे ४७८६) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ग्रॅनाइट आणि महिंद्रा कंपनीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या या ट्रकच्या चालकाने सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या भीषण धडकेत बंडू बाबी दाभोलकर (वय ५८, रा. गवाणे, ता. लांजा), रघुवीर बाळकृष्ण मसूरकर (वय ३३, रा. आडवली, जि. रत्नागिरी), बलराम हरिश्चंद्र राणे (वय ६५, रा. खारेपाटण, ता. राजापूर), सूर्यकांत शंकर साळवी (वय ३१), सानवी सूर्यकांत साळवी (वय २६), प्रांजली मंगेश राऊत (वय ९), मानसी संदीप सोदिये (वय १४), संदीप तुकाराम सोदिये (वय ४५), नीता हनुमंत शिरवांडेकर (वय ५२, सर्व रा. राजापूर, जि. रत्नागिरी), विद्या सुरेश पाटकर (वय ३१), हर्षदा अन्मय शिरांबेकर (वय ४५), विनीता विश्वास राऊत (वय ५२, सर्व रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग), प्रकाश धाकटू धावडे (वय ५४, रा. वारगाव, ता. कणकवली), विश्वास लक्ष्मण राऊत (वय ५२), शशिकला सोनू जाधव (वय ६५, रा. मुलुंड), अश्विनी जयवंत वारंग (वय २०), नयन दीपक कुलकर (वय १०, रा. विरार), रुतवी अभिषेक पारकर (वय १०), यशवी अभिषेक पारकर (वय ५), अश्विनी जयवंत वालम (वय २०), आराध्या अभिषेक पारकर (वय ३५, सर्व रा. मुंबई), तक्रारदार ऋषिकेश अनंत जोशी (वय २३, रा. विरार) आणि स्वतः ट्रक चालक दिलावर सुमार खान हे जखमी झाले आहेत.

अपघातानंतर लांजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९५/२०२६ नुसार आरोपी ट्रक चालक दिलावर सुमार खान (वय ३६, रा. निंबा बिडा, जि. जैसलमेर, राजस्थान) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५(अ), १२५(ब), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून लांजा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.