रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकण नगर परिसरात प्रज्ञा हॉस्पिटलजवळ असलेल्या एका घरातून अज्ञात चोरट्याने कपाटाच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण नगर येथील घर क्रमांक ७५०/बी/५ मध्ये राहणारे फिर्यादी नझीर अब्दुल्ला वणू (वय ६२) यांच्या घरी ही चोरीची घटना घडली. १५ सप्टेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्याने संधी साधत फिर्यादींच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटाच्या लॉकरची त्याच ठिकाणी ठेवलेली चावी वापरून लॉकर उघडले. त्यानंतर फिर्यादींच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने लॉकरमधील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.
चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये २२ हजार रुपयांची रोख रक्कम, १ लाख २० हजार रुपये किमतीचा ४ तोळे वजनाचा सोन्याचा हार, १ लाख १० हजार रुपये किमतीचा साडेतीन तोळ्याचा रोडियम सोन्याचा हार, ४० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १ लाख रुपये किमतीचे साडेतीन तोळ्याचे दोन सोन्याचे कडे, ६० हजार रुपये किमतीची कानातील चार सोन्याची कर्णफुले व दोन सोन्याच्या रिंगा, १० हजार रुपये किमतीच्या २ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या छोट्या रिंगा आणि १० हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन अशा एकूण ४ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या ऐवजाचा समावेश आहे.
याप्रकरणी नझीर अब्दुल्ला वणू यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घरातील चावीचा वापर करून लॉकर उघडण्यात आल्याने या चोरीमागे कोणीतरी माहितीगार व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जात असून रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.









