चिपळूण:- सावर्डे येथून ९ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले असून, शुक्रवारी (दि. १३) मुंबई येथून अपहृत मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या संबंधित युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या मुलीच्या अपहरणानंतर सावर्डे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य आणि सावर्डे परिसरात निर्माण झालेले तणावाचे वातावरण लक्षात घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणासाठी क्यू.आर.टी. पथके तैनात केली होती.
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस (खेड), सुरेश कदम (लांजा), स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि सावर्डेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र तपास पथके नेमून शोधमोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे विविध ठिकाणी शोध घेतला असता, अखेर शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबईतून या दोघांनाही ताब्यात घेतले. सद्यस्थितीत संबंधित अल्पवयीन मुलीला महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आले असून, ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही यशस्वी कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग गोटे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे, दीपराज पाटील, गणेश सावंत आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांच्या पथकाने पार पाडली.









