रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजीवडा बांध परिसरात घराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी झाडू मारत स्वच्छता करणाऱ्या एका प्रौढावर अचानक चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय झालेल्या या हल्ल्यात स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राजीवडा बांध येथील घर क्रमांक ११२ जवळ ही घटना घडली. स्थानिक रहिवासी अब्दुल रशिद मजिद वस्ता (वय ४८) हे घराजवळील बांधकामाच्या ठिकाणी झाडू मारत असताना, त्याच भागातील रहिवासी ईरफान अमिरुद्दीन सुवर्णदुर्गकर (वय ४३) हा अचानक त्या ठिकाणी आला. वाद अथवा वादाचे कोणतेही कारण नसताना ईरफानने हातातील चाकूसारख्या धारदार शस्त्राने वस्ता यांच्यावर सपासप वार केले.
या अचानक झालेल्या हल्ल्यात अब्दुल रशिद वस्ता यांच्या डाव्या खांद्यावर तसेच हनुवटीच्या डाव्या बाजूला वार बसल्याने ते रक्तबंबाळ होऊन जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ घबराट पसरली होती. जखमी वस्ता यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी फिर्यादी अब्दुल रशिद मजिद वस्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपी ईरफान सुवर्णदुर्गकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये (गु.र.क्र. ४५७/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर पोलीस या हल्ल्यामागील कारणाचा पुढील तपास करत आहेत.









