चिपळूण सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
चिपळूण:- गुहागर तालुक्यातील एका प्रौढ महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी दुनदुनकुमार रामप्रवेश महतो याला चिपळूण सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक हजार रुपये दंड आणि अन्य कलमान्वये कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. ही घटना २०१९ मध्ये घडली होती.
पीडित महिला गावाबाहेरील शेतात काम करत असताना पावसाळ्यात आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा दाबून व कपड्याने आवळून जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिच्यावर झाडाझुडपांच्या फांद्या टाकून तेथून पळ काढला.
घटनेनंतर पीडितेने नातेवाईक, पोलीस पाटील व ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेतला असता तो गावाबाहेरील गॅस कंपनीच्या पाईपलाईनच्या कामाजवळ आढळला. त्याला पकडल्यानंतर पीडितेने ओळख पटवली. यानंतर गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तपास अधिकारी संदीप पाटील यांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. अनुपमा ठाकूर यांनी नऊ साक्षीदार तपासून प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर चिपळूण सत्र न्यायाधीश श्री. म्हाळटकर यांनी आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३७६ अन्वये जन्मठेप व एक हजार रुपये दंड, तसेच कलम ३०७ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय कलम ३४१ व ३४२ अन्वये प्रत्येकी एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
या खटल्यात गुहागर कोर्टाचे पैरवी ए. एस. शिंदे यांनीही सरकारी पक्षाला सहकार्य केले. पीडित महिलेने दाखवलेले धैर्य, पोलिसांचा तपास आणि सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद यामुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळाली आहे. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कायदा कठोर भूमिका घेतो, हा संदेश या निकालातून समाजाला मिळाला आहे.









