लोखंडी फाईट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या झाडगाव येथील योजक कंपनीजवळ भररस्त्यात जुन्या वैमनस्यातून रिक्षा अडवून चालकाला शिवीगाळ करत लोखंडी फाईटने गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून मारहाण करणाऱ्या दोघा संशयित तरुणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरुगवाडा येथील रहिवासी असलेले ५० वर्षीय रिक्षाचालक शेखर चंद्रकांत भोगले हे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आपली ऑटो रिक्षा (क्र. एमएच ०८ एक्यू ५९८८) घेऊन पांढरा समुद्र नाका ते खालची आळी झाडगाव या मुख्य रस्त्यावरून जात होते. ते योजक कंपनीजवळ पोहोचले असता, त्यांच्याच वाडीत राहणाऱ्या राहुल राजेंद्र पिलणकर याने आपली दुचाकी (क्र. एमएच ०८/९०९९) अचानक त्यांच्या रिक्षासमोर आडवी मारून गाडी अडवली. त्यानंतर “तू माझी इज्जत काढतोस का?” असा जाब विचारत राहुलने रिक्षाचालकाला अश्लील शिवीगाळ सुरू केली. वाद वाढत गेल्यावर राहुल पिलणकर आणि त्याचा साथीदार स्वेजस राजेश पिलणकर (वय २६, रा. मुरुगवाडा) या दोघांनी शेखर भोगले यांना रिक्षातून खाली ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीदरम्यान स्वेजस पिलणकर याने आपल्या हातातील लोखंडी फाईटने भोगले यांच्या उजव्या डोळ्याच्या वर भुवईजवळ तसेच पाठीवर जोरदार प्रहार करून त्यांना रक्तबंबाळ केले. त्याचवेळी राहुल पिलणकर याने त्यांच्या कानाजवळ आणि तोंडावर हाताच्या मुठींनी सपासप ठोसे मारून गंभीर दुखापत केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. जखमी शेखर भोगले यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले.
या प्रकरणी जखमी शेखर भोगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित आरोपी स्वेजस राजेश पिलणकर आणि राहुल राजेंद्र पिलणकर या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.









