Monday, May 18, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वेरवली बुद्रुक येथे पायवाटेच्या वादातून दोन महिलांकडून कुटुंबाला मारहाण

वेरवली बुद्रुक येथे पायवाटेच्या वादातून दोन महिलांकडून कुटुंबाला मारहाण

लांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथे गेल्या एका वर्षापासून सुरू असलेल्या पायवाटेच्या वादातून दोन महिलांनी शेजाऱ्यांना शिवीगाळ करत दगडफेक आणि हाताने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन महिलांवर लांजा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिपाली दीपक डोळस (वय ६७ वर्षे) आणि रुपाली दीपक डोळस (वय ३६ वर्षे, दोन्ही रा. वेरवली बुद्रुक डोळसवाडी, ता. लांजा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी विशाल मारुती डोळस (वय ४४ वर्षे, सध्या रा. ठाणे, मूळ रा. वेरवली बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी विशाल डोळस आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांच्यात गेल्या एक वर्षापासून घरासमोरील पायवाटेच्या रस्त्यावरून वाद सुरू आहे. गुरुवार, १४ मे ते शुक्रवार, १५ मे दरम्यान विशाल डोळस हे आपल्या कुटुंबीयांसह या पायवाटेवरून जात होते. यावेळी आरोपी दिपाली आणि रुपाली डोळस यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला अडवून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपींनी फिर्यादींच्या दिशेने दगडफेक केली, जो दगड विशाल यांच्या मुलीच्या डोक्यावरून थोडक्यात हुकला.

मारहाणीदरम्यान आरोपींनी विशाल डोळस यांना हाताने थापडा मारल्या. तसेच, “तू तुझी टाटा नेक्सॉन गाडी (क्र. MH-04-LM-2722) येथे घेऊन आलास, तर ती फोडून टाकू,” अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर, आरोपींनी फिर्यादी यांच्या वृद्ध आईच्या अंगावर कंपाउंडसह सिमेंटचा पोल ढकलून देऊन त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला.
​या त्रासाला कंटाळून विशाल डोळस यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलिसांनी १६ मे रोजी मध्यरात्री ३:२० वाजता भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५, ११५(२), १३१, ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गु.र.नं. १०४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.