Wednesday, August 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी भाटये येथे कौटुंबिक वादातून महिलेवर प्राणघातक हल्ला

भाटये येथे कौटुंबिक वादातून महिलेवर प्राणघातक हल्ला

रत्नागिरी:- शहरालगतच्या भाटये महाजनवाडी येथे दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर पत्नीवर दगडानं प्राणघातक हल्ला केल्याची उद्वेगजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास भाटये महाजनवाडी येथील फिर्यादी यांच्या घरी घडला. याप्रकरणी २४ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी गुन्हा नोंदवण्यात आला.

आरोपी कैलास सुधीर भाटकर हा दारू पिऊन आणि नॉनव्हेज चायनीज डिशचे पार्सल घेऊन पत्नीच्या घरी आला होता. त्यावेळी त्याची पत्नी तथा फिर्यादी गौरी कैलास भाटकर (वय ४१, रा. भाटये महाजनवाडी) यांनी त्याला, “तू घरी का आलास? तुला आज बायको व मुलग्याची आठवण कशी काय आली? तू रुचीसोबत राहा,” असे म्हटले. यावरून संतापलेल्या आरोपीने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वडिलांना असे भांडताना पाहून त्यांचा अल्पवयीन मुलगा आराध्य हा मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला आणि त्याने, “बाबा, माझ्या आईला शिव्या देऊ नका,” अशी विनंती केली. याचा राग आल्याने आरोपीने मुलाचा हात पकडून त्याला घराबाहेर रस्त्यावर नेले. मुलाला ओढून नेताना पाहून फिर्यादी गौरी यांनी, “मुलाला हात लावायचा नाही, भांडण आपल्या दोघांचे आहे,” असे म्हणत मुलाला आरोपीच्या तावडीतून सोडवून आपल्याजवळ घेतले.

याचा अधिकच राग आल्याने आरोपीने रागाच्या भरात रस्त्यावरील दगड उचलून थेट फिर्यादी पत्नीच्या डोक्यात घातला, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
​याप्रकरणी जखमी गृहिणी गौरी कैलास भाटकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी कैलास सुधीर भाटकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११७(१), ३५२ तसेच जुन्या भारतीय दंड विधान संहितेनुसार (भा.द.वि.क.) कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.