मंडणगड पोलिसांची कारवाई
मंडणगड:- तालुक्यातील दहागाव-जाधववाडी येथील घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून आठ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले होते. याप्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात २१ ऑगस्टला तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयिताला मुंबई येथून ताब्यात घेतले असून, चोरलेले मंगळसूत्रही हस्तगत केले आहे.
पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत ही चोरी झाली. फिर्यादी रवींद्र विष्णू जाधव (वय ३४, रा. दहागाव जाधववाडी, मंडणगड) यांच्या घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून त्यामध्ये ठेवलेले त्यांच्या पत्नी अर्चना जाधव यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. मंडणगड पोलिसांनी संशयित पवन संभाजी सुतार (२९, मूळ रा. चांदेवाडी, कोल्हापूर) याचा शोध घेतला. त्याला मुंबई येथून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर २२ ऑगस्टला त्याला अटक करण्यात आली व पंचनामा करून सुमारे ६४.४८ ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे आठ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले. हे मंगळसूत्र लवकरच वरिष्ठांच्या उपस्थितीत जाधव यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.









