१२ तडीपार, ९ गजाआड; १२ जणांवर हद्दपारीची टांगती तलवार
रत्नागिरी:- जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या जाळ्यात ढकलणाऱ्या ड्रग्ज माफियांवर रत्नागिरी पोलिसांनी आता थेट “प्रहार ” केला आहे. तरुणपिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या या काळ्या धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. केवळ गुन्हे दाखल न करता आरोपींची थेट जिल्ह्यातून हद्दपारी आणि तुरूंगात रवानगी करून कठोर कारवाईचा दुहेरी फास आवळला आहे.
या धडक मोहिमेंतर्गत पोलिसांनी वर्षभरात एनडीपीएस कायद्यानुसार १२ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे तर अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीत सक्रिय असलेल्या ९ आरोपींना गजाआड करून थेट तुरुंगात धाडले आहे.
पोलिसांची ही धडक कारवाई इथेच थांबलेली नसून, आणखी १२ आरोपींच्या तडीपारीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे ड्रग्जच्या अवैध साखळीत काम करणाऱ्या अनेक सराईत गुन्हेगारांना लवकरच जिल्ह्याबाहेर पडावे लागणार आहे. केवळ अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवरच नव्हे तर पुरवठादार आणि विक्रेते या मुख्य साखळीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
पर्यटनस्थळ असलेल्या रत्नागिरीत अंमली पदार्थांचा सुळसुळाट होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे. जिल्हा अंमली पदार्थांच्या विळख्यात जाऊ नये यासाठी ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. ड्रग्जच्या तस्करीत किंवा विक्रीत सहभागी असणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. अवैध धंदे मुळासकट उपटून टाकण्यासाठी पोलिसांचा हा प्रहार यापुढेही असाच सुरू राहणार असून, रत्नागिरीला अंमली पदार्थमुक्त जिल्हा करण्याच्यादृष्टीने पोलिस दलाचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांना कुठेही संशयास्पद हालचाली, ड्रग्जची विक्री किंवा तस्करी आढळल्यास त्वरित पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुख्य पुरवठादारापर्यंत पोहोचण्यात अपयश
पोलिसांना मिळालेल्या संशयितांची चौकशी केली असता मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, बेळगाव, आदी भागातून हे अंमली पदार्थ जिल्ह्यात आणले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे; परंतु यांच्या मुख्य पुरवठादारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही. त्यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर कायमचा प्रतिबंध आणण्यासाठी ‘तडीपारी’सारख्या कठोर पावलांचा वापर पोलिसांनी केला आहे.









