शांतिनगर येथील व्यक्तीची फसवणूक, गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर शाखेतून ऑनलाइन पद्धतीने खात्यावरील ५,८६,००९ रुपयांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ३१ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार २५ जुलै रोजी सायंकाळी ६:३६ ते ७:३७ या वेळेत घडला. फिर्यादी राजेश रमेश सोहनी (वय, व्यवसाय – कर सल्लागार, रा. आश्रय शांतिनगर, नाचणे, ता. जि. रत्नागिरी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचे मित्र धीरज अर्जुन भानुशाली (रा. शांतिनगर, ता. जि. रत्नागिरी) यांचे बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर शाखेत बचत खाते आहे. या खात्यावरून कोणीतरी अज्ञात इसमाने ऑनलाइन पद्धतीने परस्पर ५,८६,००९ रुपये काढून त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) तसेच जुन्या भारतीय दंड संहितेच्या (भा.द.वि.) कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.









