चिपळूण:- चिपळूण येथील बरुमतळी परिसरात राहणाऱ्या एका ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा फणसाच्या झाडावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिल शिवरामराव चव्हाण असे या दुर्दैवी मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण हे दि. २१ जून रोजी सकाळी ८.१५ वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या घरासमोर असलेल्या फणसाच्या झाडावर फणस काढण्यासाठी चढले होते. यावेळी त्यांचा पाय घसरल्याने ते थेट जमिनीवर कोसळले. या अपघातात त्यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली.
अपघात घडल्यानंतर त्यांचे सुपुत्र अमर अनिल चव्हाण यांनी त्यांना तत्काळ चिपळूणमधील वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारांसाठी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना पुणे येथे हलवण्यात आले, परंतु तेथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या कलमांतर्गत अपघाती मृत्यूच्या प्रकरणांची पोलीस चौकशी आणि मरणान्वेषण केले जाते. या दुर्दैवी घटनेमुळे चव्हाण कुटुंबियांवर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.









