Friday, May 1, 2026
spot_img
Home चिपळूण असुर्डे येथे तिहेरी अपघात; एकाचा जागीच मृत्यू

असुर्डे येथे तिहेरी अपघात; एकाचा जागीच मृत्यू

चिपळूण:- मुंबईहून संगमेश्वरकडे जात असताना बेदरकारपणे वाहन चालविल्याने झालेल्या तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. ही घटना चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.

सावर्डे पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार अशोक मादगे (वय 35) हे आपल्या कारने पुणे ते साडवली असा प्रवास करत होते. त्यांच्या सोबत पत्नी रूपाली आणि मुलगी साजिरी या होत्या. असुर्डे बौद्धवाडी येथे त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. दरम्यान, मुंबईहून संगमेश्वरकडे जाणाऱ्या चंद्रकांत गावडे यांनी आपल्या ताब्यातील कार भरधाव आणि बेदरकारपणे चालवित असताना प्रथम पादचारी विजय बाबाराम सावर्डेकर (रा. असुर्डे) यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटून उभ्या असलेल्या मोटारगाडीला धडक बसली.

या भीषण अपघातात पादचारी विजय सावर्डेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटार चालक सुयोग तानाजी हुमणे हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी वाढत्या वेगवान आणि वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली.