Thursday, October 22, 2026
spot_img
Home चिपळूण कोंडमळा येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कोंडमळा येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

चिपळूण:-  तालुक्यातील कोंडमळा निवाचीवाडी येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी खिडकीच्या लोखंडी ग्रीलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दारूच्या अतिव्यसनातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वासुदेव बयाजी सावर्डेकर (वय ४०, रा. कोंडमळा निवाचीवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत वासुदेव सावर्डेकर यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. दरम्यान, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपासून ते १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यानच्या कालावधीत त्यांनी आपल्या राहत्या घराच्या समोरील बाजूस असलेल्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. सकाळी हा धक्कादायक प्रकार कुटुंबीयांच्या आणि ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.

या घटनेची माहिती मिळताच मयताचे पुतणे सुहास रघुनाथ सावर्डेकर यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजि. नं. २५/२०२६ नुसार नोंद केली आहे. या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सावर्डे पोलीस करत आहेत.