चिपळूण:- येथील शंकरवाडी परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय विवाहित परिचारिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल उघडकीस आली. या धक्कादायक घटनेमुळे चिपळूणसह देवरूख परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृणाली प्रफुल्ल खेराडे (वय २७, रा. शंकरवाडी, चिपळूण) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मृणाली यांचे माहेर देवरूख (भुवड कॉलनी) येथील असून, त्या मंडणगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून सेवा बजावत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, मृणाली खेराडे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी चिपळूण शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पती आणि एक चार वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.









