Tuesday, June 9, 2026
spot_img
Home रत्नागिरी दुर्मिळ प्रजातीतील समुद्री घोड्यांचे रत्नागिरीत यशस्वी पुनर्वसन

दुर्मिळ प्रजातीतील समुद्री घोड्यांचे रत्नागिरीत यशस्वी पुनर्वसन

रत्नागिरी:- येथील मिऱ्या, काळबादेवी आणि शिरगाव खाड्यांमध्ये मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकलेल्या तीन समुद्री घोड्यांना (सी हॉर्स) सुरक्षितपणे वाचवून त्यांना समुद्रात सोडण्यात आले. हे ‘शेड्युल १’ मधील दुर्मीळ जीव असल्यामुळे त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि वनविभागाच्या कांदळवन कक्षाच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली. किनारी भागात मासेमारी जाळ्यात हे समुद्री घोडे आढळले होते. सुटका केल्यानंतर ते पूर्णपणे निरोगी होईपर्यंत त्यांना रत्नागिरी येथील ‘बीएनएचएस’च्या फिल्ड स्टेशनमधील पुनर्वसन केंद्रातील नियंत्रित वातावरणात ठेवले होते.

सागरी शास्त्रज्ञ डॉ. तेजल विजयपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची देखभाल करण्यात आली. पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना समुद्रात सोडण्यात आले. यावेळी वनक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. हरीश धामगये, मत्स्यपालन महाविद्यालयाचे डॉ. जी. एस. घोडे आदी उपस्थित होते.

मॅमुव्ह अॅण्ड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशनच्या (एमएमबीसीएफ) सहकायनि २०२४ पासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर समुद्री घोडा संवर्धन प्रकल्प राबवत आहे. सर्वेक्षणामध्ये समुद्री घोड्यांचे अधिवास ओळखले गेले आहेत. संस्थेने स्थानिक मच्छीमारांचे पथक स्थापन केले असून, त्यांच्याद्वारे मासेमारीवेळी सापडलेल्या समुद्री घोड्यांची माहिती देण्यास व त्यांची सुटका करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.- डॉ. तेजल विजयपुरे, सागरी शास्त्रज्ञ, बीएनएचएस