Monday, June 1, 2026
spot_img
Home संगमेश्वर आंब्याच्या झाडावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

आंब्याच्या झाडावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

संगमेश्वर:- आंबा झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा खाली पडून गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिलीप बाळ्या धामणक (वय ५२, रा. धामणकवाडी, कडवई, ता. संगमेश्वर) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास दिलीप धामणक आपल्या घराजवळ असलेल्या आंबा झाडावर चढले होते. घरावर आलेली फांदी तोडणे हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, फांदी तोडत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते झाडावरून थेट खाली जमिनीवर कोसळले. या अपघातात त्यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला होता, तसेच उजव्या पायालाही मोठी दुखापत झाली होती.

​अपघातानंतर त्यांना तातडीने संगमेश्वर येथील डॉ. दौड यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना सावर्डे येथील वालावलकर रुग्णालयात (डेरवण) हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि मृत घोषित केले.

​या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ. क्रमांक २१/२०२६) केली आहे. झाडावरून पडून झालेल्या या अपघाताने धामणकवाडी परिसरात शोककळा पसरली असून, एका कर्तबगार शेतकऱ्याचा असा अपघाती अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.