रत्नागिरी राधाकृष्ण नगर येथील धक्कादायक घटना
रत्नागिरी:- गेल्या अनेक दिवसांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या एका सव्वा वर्षाच्या चिमुरड्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. विशाल खाजणेकर (वय १ वर्ष, १७ दिवस) असे या मृत बालकाचे नाव असून, या घटनेमुळे मजगाव रोड परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत विशाल याला ‘बिलरी आट्रेशिया’ हा यकृताचा गंभीर आजार होता. या आजारामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होणे आणि पोट फुगणे अशा समस्या भेडसावत होत्या. त्याच्या उपचारासाठी खाजणेकर कुटुंबीयांनी गोवा मेडिकल कॉलेज (बांबोळी-पणजी), मुंबईतील के.ई.एम. रुग्णालय आणि वाडिया रुग्णालय अशा नामांकित संस्थांमध्ये धाव घेतली होती. तिथे उपचार घेऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला रत्नागिरीतील घरी आणण्यात आले होते.
विशालवर घरीच ऑक्सिजन लावून उपचार सुरू होते. मात्र, २९ एप्रिल रोजी सकाळी ९:१० च्या सुमारास त्याला अचानक रक्ताची उलटी झाली. प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच वडील विशाल वसंत खाजणेकर यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एका लहान मुलाचा अशा प्रकारे आजाराने मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.









