हातखंबा येथील खळबळजनक घटना
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील बाणखिंड येथील रहिवासी असलेले उदय वासुदेव सागवेकर (वय ५४) यांचा मृतदेह हातखंबा-करवती येथील काजूच्या बागेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळपासून ते बेपत्ता होते.
मिळालेल्या माहितीनुसार, उदय सागवेकर हे सोमवारी सकाळी ११:३० वाजता आपल्या ताब्यातील ज्युपिटर गाडी (क्रमांक MH-08 AF-7461) घेऊन घरातून बाहेर पडले होते. मात्र, दीर्घकाळ उलटल्यानंतरही ते घरी न परतल्याने आणि त्यांचा फोन लागत नसल्याने त्यांची पत्नी छाया सागवेकर यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी ही बाब उदय यांचे भाऊ चंद्रशेखर सागवेकर यांना फोनवरून कळवली.
भाऊ चंद्रशेखर यांनी उदय यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांच्या मदतीने उदय यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, ते हातखंबा-करवती परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चंद्रशेखर आणि कुटुंबीयांनी त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, उदय सागवेकर हे तेथील एका काजूच्या बागेत जमिनीवर उताण्या स्थितीत बेशुद्ध पडल्याचे दिसून आले.
त्यांना तातडीने उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. २१ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता ही नोंद करण्यात आली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.









