जिल्ह्यात ‘रोअर’ मशिनच्या आगमनाने मानवी त्रुटींना पूर्णविराम
रत्नागिरी:- जिल्ह्यातील जमीन मोजणीच्या प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या दिमतीला तब्बल ७८ अत्याधुनिक ‘रोअर’ मशिन्स दाखल झाल्या आहेत. यामुळे अवघ्या ३ ते १० सेकंदांत अचूक रीडिंग मिळून अक्षांश-रेखांशासह जमिनीचा नकाशा (मॅप) स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे मोजणीतील मानवी त्रुटी दूर होऊन वाद मिटण्यास मदत होणार आहे. तसेच शासनाने मोजणी शुल्कात मोठी कपात केल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाऊ हिस्सा वेगळा करण्याचे शुल्क २ हजार रुपयांवरून फक्त २०० रुपयांवर आणले आहे; मात्र, यामुळे भूमीअभिलेख विभागाच्या वार्षिक महसुलात घट झाली आहे.
भूमीअभिलेख विभागाने मोजणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणण्यासाठी पूर्वीचे क्लिष्ट प्रकार बंद करून आता केवळ ‘साधी मोजणी’ आणि ‘जलद मोजणी’ असे दोनच प्रकार ठेवले आहेत. १० हेक्टर जमिनीच्या मोजणीसाठी ४ हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून, त्यापुढील प्रत्येक हेक्टरसाठी नियमानुसार शुल्क वाढणार आहे. जिल्ह्यात मोजणी कामांसाठी पुरेशा सर्व्हेअरांची (भूमापक) नियुक्ती करण्यात आली असून, सध्या मनुष्यबळाचा कोणताही प्रश्न प्रलंबित नाही.
नवीन रोअर मशिनमुळे आता बांधावर होणारे कलाई आणि वेळेचा अपव्यय टळणार असून, मुंबई-पुण्यातील खातेदारांनी सहकार्य केल्यास प्रलंबित ३५० प्रकरणेही काही दिवसांत निकाली निघतील, असा विश्वास भूमीअभिलेख विभागाने व्यक्त केला आहे.
एकीकडे तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ सज्ज असले तरी जिल्ह्यात अजूनही जमीन मोजणीची ३५० प्रकरणे प्रलंबित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक जमिनींचे खातेदार नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. मोजणीच्या वेळी सर्व संबंधित भागधारकांची सांगड घालणे प्रशासनाला कठीण जात आहे. सर्व खातेदार वेळेत एकत्र येत नसल्यामुळेच ही मोजणी रखडल्याचे चित्र आहे.









