हातखंबा: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी परिसरात गद्रे पेट्रोल पंपासमोर पहाटेच्या सुमारास प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागून गाडी पूर्णतः जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व ३० प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) यांच्या ताब्यातील एनएल ०१ बी २४४२ क्रमांकाची प्रवासी ट्रॅव्हल्स पुणे येथून सायंकाळी सहाच्या सुमारास ३० प्रवाशांना घेऊन रत्नागिरीकडे निघाली होती. ही गाडी पहाटे सुमारे ३.३० वाजता साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर पोहोचताच अचानक वाहनातून धूर आणि नंतर ज्वाळा उठताना चालकाच्या निदर्शनास आले.
चालकाने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता सर्व प्रवाशांना तत्काळ गाडीतून खाली उतरवले. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत ट्रॅव्हल्स पूर्णतः भस्मसात झाली होती. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर तसेच चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मार्ग बदलून दिला तसेच प्रवाशांना आवश्यक ती मदत केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.









