Thursday, June 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जुन्या कौटुंबिक वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारी; तिघे जखमी

जुन्या कौटुंबिक वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारी; तिघे जखमी

संगमेश्वर:- तालुक्यातील पांचाचे नेरदवाडी येथे जुन्या कौटुंबिक वादातून दोन नातेवाईकांनी एका व्यक्तीसह त्याच्या आईला आणि मध्यस्थी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी संतोष महादेव सावंत (वय ४८) आणि आरोपी शाम शंकर घाडगे व रत्नकांत बचन घाडगे हे सर्व नेरदवाडी येथील रहिवासी असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात गेल्या १० वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू आहेत.

२३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संतोष सावंत हे शेजारी सुनील जाधव यांच्या घरी गप्पा मारत बसले होते. यावेळी आरोपी शाम घाडगे याने दारूच्या नशेत येऊन संतोष यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतोष यांनी याचा जाब विचारला असता, दुसरा आरोपी रत्नकांत घाडगे हातात लाकडी काठी घेऊन तिथे आला. त्याने संतोष यांच्या हातावर, पाठीवर आणि छातीवर काठीने प्रहार करत “तुला संपवून टाकीन,” अशी धमकी दिली.

​हा वाद सोडवण्यासाठी संतोष यांची आई नलिनी सावंत आणि शेजारी राहणारा ओम प्रदीप पवार धावून आले. मात्र, दोन्ही आरोपींनी त्यांनाही हाताने आणि लाकडी काठीने मारहाण केली. या घटनेत संतोष सावंत, नलिनी सावंत आणि ओम पवार हे तिघेही जखमी झाले आहेत. सुनील जाधव, जयवंत घाडगे आणि रमेश घाडगे यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली असून त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

​याप्रकरणी २४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २१८(२), १११(२), ३१२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे.