Tuesday, May 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जमीन वादातून साठरेबांबर येथे वृद्ध शेतकऱ्याला घरात घुसून धमकी; नऊ जणांवर गुन्हा...

जमीन वादातून साठरेबांबर येथे वृद्ध शेतकऱ्याला घरात घुसून धमकी; नऊ जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील साठरेबांबर ठोंबरेवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून त्यांना शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका महिलेसह एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जयंत भार्गव पिंपटकर (वय ६८, रा. साठरेबांबर ठोंबरेवाडी) हे शेती करून आपले जीवन व्यतीत करतात. रविवार, ३ मे रोजी सकाळी १०:२० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरी असताना, आरोपी मेघना शरद मोघे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सात-आठ मुली व एका पुरुषाने फिर्यादी यांच्या घराच्या बाजूला असलेल्या कंपाऊंडमध्ये आणि जागेत अनधिकृतपणे प्रवेश केला. जमीन जागेच्या जुन्या कारणावरून या सर्वांनी मिळून जयंत पिंपटकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर जयंत पिंपटकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रात्री ११:१९ वाजता गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मेघना शरद मोघे, आणि ७ ते ८ अज्ञात मुली आणि तसेच १ अज्ञात पुरुष यांच्यावर भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३२९(१), ३२९(२), ३२९(३) (घरात अनधिकृत प्रवेश), १८९(२), १९१(२), १९० (बेकायदेशीर जमाव), ३५२ (शांतता भंग), आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भरदिवसा घरात घुसून एका ज्येष्ठ नागरिकाला अशा प्रकारे धमकावल्यामुळे साठरेबांबर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकरणातील इतर अज्ञात सात-आठ मुली आणि त्या एका पुरुषाचा शोध घेत आहेत. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.