जुन्या वादातून महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण

उन्हाळे येथील घटना

राजापूर:- पाणी भरण्यावरून पाच-सहा वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका ५० वर्षीय महिलेने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. राजापूर तालुक्यातील उन्हाळे-सोडचेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विद्या विजय सोडचे (वय ४०) या २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास आपल्या राहत्या घरातील मोरीमध्ये कपडे धुवत होत्या. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारी आरोपी सावित्री धनाजी सोडचे (वय ५०) ही हातात लाकडी दांडा घेऊन अनधिकृतपणे विद्या यांच्या घरात शिरली. ​५ ते ६ वर्षांपूर्वी पाणी भरण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून सावित्रीने विद्या यांना गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. तसेच हाताच्या थापटाने पाठीवर मारहाण करून त्यांना जखमी केले.

​या मारहाणीत विद्या सोडचे जखमी झाल्या असून त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने दखल घेत आरोपी सावित्री धनाजी सोडचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ३३, ११५(१) आणि ३५२ गुन्हा दाखल केला आहे.

​राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गावातील जुन्या वादाचे रूपांतर अशा हिंसक कृत्यात झाल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.