जिल्हाभरात पावसाचा पुन्हा जोर, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचा परिणाम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र आज दिवसभर संततधार सुरू होती. प्रमुख मोठ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी इशारा पातळीवर येऊन ठेपल्यामुळे किनारी भागातील लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने 2 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिल्यामुळे ऐन गणेशोत्सवात गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 21.97 मिलिमीटर पाऊस झाला. शुक्रवारी दिवसभर संततधार सुरू होती. जगबुडी, नारंगी, वाशिष्ठी, शास्त्री, बावनदी, काजळी, कोदवली, अर्जुना या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, वहाळांसह छोट्या नद्यांचे पाणी वाढलेले आहे. प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोघेजण नदी ओलांडत होते. त्याचवेळी पाणी वाढल्यामुळे एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला असून, दुसरा सुखरूप किनाऱ्यावर सुखरूप आला आहे. वाहून गेलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

जिल्ह्यात मंडणगड 11 मिमी, खेड 13, दापोली 13, चिपळूण 17.67, गुहागर 11.60, संगमेश्वर 24, रत्नागिरी 28.77, लांजा 56, राजापूर 22.75 मिमी नोंद झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती; मात्र कालपासूनच जिल्ह्यात पुन्हा मोसमी पाऊस सक्रिय झालेला आहे. जिल्ह्यात घरोघरी उत्सवाचे वातावरण आहे; मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे गणपती दर्शनासाठी एकमेकांकडे जाण्यात व्यत्यय येत आहे. दोन दिवसांनी गौरीपूजन, ओवसे या तयारीत ग्रामीण भागातील महिलावर्ग गुंतलेल्या आहेत. सततच्या पावसामुळे नद्या, नाल्यांना पाणी आले आहे. हा जोर असाच कायम राहिला तर पूरपरिस्थितीची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवातील या वातावरणामुळे गणेशभक्तांची पंचाईत झालेली आहे.

दरम्यान, पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मच्छीमारीत अडथळा निर्माण झाला असून, गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांनी नौका किनाऱ्यावर उभ्या करून ठेवल्या आहेत. काल वातावरणाचा अंदाज घेऊन समुद्रात मासेमारीला गेलेल्या काही नौका आज सकाळी माघारी परतल्या आहेत. प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे या आठवड्यातही मच्छीमारांना बंदरातच राहावे लागणार आहे.