रत्नागिरी:- चिपळूण शहरातील एलआयसी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. यात हा कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विष्णू शिंदे (वय ४२, खेंड,चिपळूण), गुरुप्रसाद आदिनाथ पाटील (२८, पानगल्ली, चिपळूण), श्रावणी सतीश चिपळूणकर (३५), शहजीन मुन्वर हुजरे (३५), स्मिता रेडीज (३५,) राजेंद गोंजारे (३७), स्वप्नील घारे (३८, सर्व चिपळूण) यासह अन्य तिघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद संतोष सीताराम चव्हाण (५३, बुरुमतळी, चिपळूण) यांनी दिली आहे. संतोष चव्हाण हे शहरातील एलआयसी कार्यालयामध्ये उच्च श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयात असताना दहाजण बेकायदेशीर जमाव जमवून त्यांच्या कार्यालयामध्ये शिरले. यावेळी चव्हाण यांना जाब विचारत त्यांनी कार्यालयातच मारहाण केली. या मारहाणीत चव्हाण यांच्या तोंडासह हातावर जखम झाली आहे.









