Sunday, May 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी भाजपला मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण

भाजपला मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण

भाजप तालुकाध्यक्ष, हातीव सरपंचांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

देवरुख:- भाजप पक्षाला निवडणुकीत मतदान न केल्याचा राग मनात धरून संगमेश्वर तालुक्यातील गोठणे पुर्नवसन येथील तरुणाला मारहाण केली. याप्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष रुपेश कदम, हातीव सरपंच नंदकुमार कदम यांच्यासह ५ जणांवर देवरुख पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सुनील शामराव पवार (रा. गोठणे पुर्नवसन, २९) यांनी फिर्याद दिली आहे. रुपेश कदम, नंदकुमार कदम (दोघेही रा. हातीव), अक्षय शिंदे, अमित रेवाळे (रा. आंगवली), प्रथमेश धामणस्कर (रा. देवरुख) यांच्यासह चार ते पाच इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. सुनील पवार व त्यांचे मित्र अंकुश उंडे, नीलेश पवार हे जेवणासाठी १० रोजी रात्री ८.३० वाजता आर. के. हॉटेल येथे गेले होते. सुनील पवार यांचे गावातील मित्र प्रकाश उंडे यांनी निवडणुकीत मदत न केलेले माझे मित्र आर. के. हॉटेलमध्ये असल्याचे रुपेश कदम यांना दूरध्वनीवरून कळवले. त्यानंतर भाजप पक्षाला निवडणुकीत मतदान न केल्याचा राग मनात धरून नंदकुमार कदम, रुपेश कदम, अक्षय शिंदे, अमित रेवाळे, प्रथमेश धामणस्कर यांनी सुनील पवार व त्याचे मित्र यांना मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. मारहाण करणाऱ्यांवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत जाधव करीत आहेत.