रेल्वेत प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला अटक

रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान प्रौढाचा 6 हजार रुपयांचा मोबाईल लांबवणार्‍या संशयिताला न्यायालयाने गुरुवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. चोरीची ही घटना 26 जुलै 2022 रोजी रात्री 10.45 ते 11.30 वा. कालावधीत मत्स्यगंधा ऐक्सप्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर घडली होती.                                                        

दत्तात्रय शिवाजी गोडसे (21,रा. मुळ रा. सांगोला, सोलापूर सध्या रा.वाशी नवी मुंबई) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत सखाराम खांबल (57,रा.नवी मुंबई तुर्भे ठाणे) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, 26 जुलै रोजी रात्री ते मत्स्यगंध ऐक्सप्रेसने कुडाळ ते पनवले असा प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली. रात्री 11.30 वा.त्यांना रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर जाग आली तेव्हा टे्रनमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कोेकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या ट्रेनमध्ये मोठया प्रमाणात चोर्‍या होत असल्याने आरपीएफमध्ये तपास पथके नेमलेली आहे.विशेषतःराजधानी एक्सप्रेसमध्ये जास्त प्रमाणात चोर्‍या होत असल्याने ट्रेनमधील प्रवासी यादीचे अवलोकन करण्यात आले.तेव्हा दत्तात्रय गोडसे हा वारंवार प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान 14 सप्टेंबर रोजी दत्तात्रय राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करत असल्याचे टिसीकडील प्रवासी यादीमधून पोलिसांना समजताच त्यांनी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेतले.त्याची चौकशी केल्यावर त्याने प्रवास का करत असल्याचे समर्पक उत्तर दिले नाही.तसेच चौकशी दरम्यान चिपळूण,पनवेल लोहमार्ग पोलिस ठाणे,ठाणे लोहमार्ग पोलिस ठाणे आणि अन्य ठिकाणी त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

त्याच्याकडे एक मोबाईलही मिळून आलेला असून मोबाईलबाबतही तो समाधानकारक उत्तरे देत नाही.तसेच तो वारंवार पनवले ते रत्नागिरी असा प्रवास करत असून खांबल यांचा मोबाईल ही त्यानेच चोरी केल्याचा दाट संशय आल्याने पोलिसांनी त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.