रत्नागिरी:- शहरालगतच्या शिरगाव प्रशांत नगर येथे ३ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार जळून खाक झाली. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने जवळील बंगल्याला आणि परिसरातील अन्य मालमत्तेला होणारा मोठा धोका टळला.
प्रशांत नगर येथील रहिवासी सूरज जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात पार्क केलेल्या मारुती सुझुकी कारमधून मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कारला विळखा घातला. मध्यरात्रीच्या शांततेत आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे आग शेजारील घरांपर्यंत आग पसरू शकली नाही.









